तामगांव ते उजळाईवाडी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद
schedule11 May 25 person by visibility 220 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाच्या वाढीव भूसंपादनामुळे विमानतळ सुरक्षीततेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर यांच्या अखत्यारीतील विकासवाडी नेर्ली तामगांव उजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी वसगडे लांबोरे मळा ते राज्यमार्ग क्र. 177 ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 94 (भाग- तामगाव ते उजळाईवाडी) हा विमानतळाच्या भूसंपादनामुळे बाधीत होत आहे. त्यासाठी हा रस्त्याचा भाग विमानतळाच्या संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस म्हणजेच दक्षिण बाजूस वळणिकरण करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे, यांनी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 10 मे 2025 रोजी रात्री 24.00 वा. पासून प्रमुख जिल्हा मार्ग क्र 94 भाग तामगांव ते उजळाईवाडी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.
या रस्त्यामुळे विमान वाहतुकीसाठी तांत्रिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत असल्याबाबत तसेच विमानतळ प्राधिकरणास नेव्हिगेशन अँड इन्स्ट्रुमेंट लँडींग सिस्टम तसेच अन्य उपकरणे बसविण्यासाठी हा रस्ता तात्काळ बंद करणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे. सद्यस्थितीत सुरु असलेला तामगाव उजळाईवाडी विमानतळ रस्ता ते शाहू नाका येथे येण्यासाठी अंदाजे 5 कि. मी. इतके अंतर होते तर हा रस्ता बंद करुन तामगाव नेर्ली गोकुळ शिरगाव एमआयडीसी मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते शाहू नाका येथे पर्यंत येण्यासाठी अंदाजे 7 कि.मी. अंतर कापावे लागते, असे नमूद आहे. तसेच विमानपत्तन निदेशक यांनी सध्याचे युध्दजन्य परिस्थिती बघता सदरचा रस्ता तात्काळ बंद करणे आवश्यक आहे बैठकीत सुचविले आहे.
सद्यस्थितीतील तामगाव उजळाईवाडी शाहू नाका हा रस्ता नविन बाह्य वळण रस्ता पूर्ण होईपर्यंत बंद केल्यास तामगाव व परिसरातील वाहतुक तामगाव नेर्ली गोकुळ शिरगाव शाहूनाका या मार्गे वळवावी लागेल व त्यासाठो फक्त 2 कि.मी. इतके अतिरिक्त अंतर लागणार असून, हा पर्यायी रस्त्याची पाहणी केली असता सदर रस्ता सुस्थितीत व योग्य त्या रुंदीचा आहे,
कोल्हापूर विमानतळ हे अवर्गिकृत संवेदनशिल मर्मस्थळ आहे. परंतू रनवेलगतच नेली तामगांव हा रस्ता उजळाईवाडी कडून नेर्ली- तामगांव असा जात आहे. या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची वर्दळ सुरु असते. रहदारी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून हाईट बॅरीअर बसविण्यात आले होते. परंतु त्याचे नुकसान करुन वाहतूक सुरु ठेवणेत आलेली आहे. सदरची बाब ही विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. तसेच सध्या युध्दजन्य परिस्थिती असलेने कोल्हापूर विमानतळास हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच सर्व विभागाकडून विमानतळ सुरक्षे बाबत दक्षता घेणेत येत आहे. परंतु नेर्ली तामगांव हा रहदारीचा रस्ता कोल्हापूर विमानतळ रनवे लगतच असल्याने विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, तरी नेर्ली तामगांव रस्ता विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ बंद करण्यात आला आहे.
जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावणेत यावी. या उपाययोजना पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर व प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.