फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांची ‘मेटाफर’ यशवंत लघुपट महोत्सवात झळकली!
schedule11 May 25 person by visibility 196 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफर’ या लघुपटाची मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रतिष्ठेच्या यशवंत लघुपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवड झाली. येथील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये नुकतेच लघुपटाचे स्क्रिनिंग होऊन लघुपटाने वाहवा मिळविली.
शिवाजी विद्यापीठात गतवर्षीपासून बी. ए. फिल्म मेकिंग हा बारावीनंतरचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरु झाला आहे. या अभ्यासक्रमाच्या दुसर्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ‘मेटाफर’ या स्त्री प्रधान लघुपटाची निर्मिती केली आहे. साहिल धेंडे आणि प्रवीण पांढरे या दोन विद्यार्थ्यांनी लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या लघुपटात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हाताळला आहे. मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये ‘मेटाफर’चे स्क्रिनिंग करण्यात आले.
यावेळी ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल, नामवंत छायालेखक महेश लिमये, पटकथा लेखक मनिषा कोरडे, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.