शाहुवाडीतील दरोड्याचा मास्टर प्लॅन उघड; ५ सराईत दरोडेखोर गजाआड!
schedule06 Jun 26 person by visibility 117 categoryगुन्हे
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील शित्तुर (वारुण) येथे काही दिवसांपूर्वी भररात्री घरफोडी करून कुटुंबाला बेदम मारहाण करत लुटणाऱ्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या थरारक दरोड्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी परजिल्ह्यातील ५ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक ३ जून रोजी रात्रीच्या सुमारास ७ ते ८ अज्ञात दरोडेखोरांनी पाटील कुटुंबाच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील सदस्यांना काठी आणि लोखंडी हत्यारांनी मारहाण करून सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम लुटून दरोडेखोर दोन कारमधून पसार झाले होते. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली होती.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली LCB च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सांगली व धाराशिव जिल्ह्यांत सापळा रचला. या कारवाईत संतोष कुऱ्हाडे (सांगली), विनोद काळे (धाराशिव) यांच्यासह एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दरोड्यासाठी वापरलेल्या दोन कार, हत्यारे आणि चोरलेली रोख रक्कम असा एकूण ७ लाख ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही दरोडा, घरफोडी आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शाहुवाडी पोलीस करत आहेत.