५० वर्षांचा प्रलंबित रस्ता प्रश्न मार्गी; आता मुरमीकरण व डांबरीकरण लवकरच : आमदार यड्रावकर
schedule06 Jun 26 person by visibility 128 categoryसामाजिक
कोथळी : कोथळी येथील नंदिवाले वसाहतीकडे जाणाऱ्या तब्बल ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या रस्त्याच्या मुरमीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी रस्ते विकासाला प्राधान्य देत असून या मार्गाचे मुरमीकरण आणि पुढील टप्प्यात डांबरीकरणही करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोथळी येथील जुना शर्ती रस्ता ते नंदिवाले वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळ तालुका सहकारी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे होते.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. रस्ता ही प्रत्येक गावाच्या विकासाची जीवनवाहिनी असून, रस्त्याअभावी लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्यामुळे आता वाडी-वस्तीतील नागरिकांचा प्रवास सुलभ होणार असून विकासाला गती मिळणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महेश नंदीवाले यांनी केले. रस्ता खुला करण्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सुजाता बोरगावे, माजी उपसभापती राजगोंडा पाटील, रामचंद्र शिंदे, दिलीप पाटील (एम.डी.), महावीर पतसंस्थेचे चेअरमन बाहुबली ईसरान्ना, माजी उपसरपंच रावसो विभुते, रावसाहेब बोरगावे, भिमगोंडा बोरगावे, विजय खवाटे, शरद कांबळे, शीतल पाटील, रवी पुजारी, माजी पोलीस पाटील उत्तम तिवडे, राजेश विभुते, अशोक पुजारी, नितीन वायदंडे, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, परसु नंदीवाले, माणिक नंदीवाले, रामा नंदिवाले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रकाश नंदीवाले यांनी मानले.