चला करूया हद्दपार - एड्सला
schedule01 Dec 25 person by visibility 63 categoryआरोग्य
( जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर निमित्त विशेष लेख)
एक डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स निर्मूलन दिन म्हणून राबवला जातो.माध्यमांच्या जनजागृतीमुळे या रोगाला काही प्रमाणात अटकाव झाला आहे हे नाकारून चालणार नाही. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींनी सामान्यरित्या जगावे यासाठी शासन स्तरावर अनेक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांची परिणीती म्हणजे 2007 साली कोल्हापूर जिल्ह्याचा एड्सच्या बाबतीत कधीकाळी अकरा टक्के असणारा दर आज केवळ 0.4 इतक्या कमी टक्क्यांवर येऊन थांबला आहे.हे आरोग्य व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचे यश मानायला हवे ही आकडेवारी 0 टक्क्यांवर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये 21 आय सी टी सी केंद्रे ,6 एआरटी केंद्रे ,सुरक्षा क्लिनिक (गुप्तरोग) विभाग कार्यरत आहेत तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज ,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रे कार्यान्वित आहेत. या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे तसेच काही खाजगी प्रयोगशाळांमध्ये मोफत एचआयव्ही चाचणी केली जाते.
जिल्हयात एड्स विभागातर्फे माहिती शिक्षण व संवाद (आय.ई .सी) हा उपक्रम राबविण्यात येतो.12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन ते 31 ऑक्टोबर या कालवावधीत इंटेन्सिफाईड आय.ई. सी हा उपक्रम या विभागामार्फत राबविण्यात आला .या उपक्रमांतर्गत एकूण 130 गावे,70 महाविद्यालये व 384 शाळांमधून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले.
▪️कोल्हापूर जिल्हा - एड्स सद्यस्थिती
पालकांपासून बालकास होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध कार्यक्रम अंमलबजावणीबाबत एक दृष्टिक्षेप:-ऑक्टोबरअखेर सुमारे 40,701 इतक्या गरोदर स्त्रियांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली.यामध्ये केवळ 55 गरोदर माता या एचआयव्ही संसर्गित असलेल्या आढळून आल्या. त्यापैकी पूर्वीच्याच 44 माता होत्या.म्हणजे केवळ 11 माता पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. गतवर्षी तसेच यंदा पॉझिटिव्ह महिलेच्या पोटी जन्मलेल्या दीड वर्ष पूर्ण झालेल्या 113 मुलांची ऑक्टोंबर अखेर अंतिम तपासणी केली असता ही सर्वच्या सर्व निरोगी आल्याचे आढळून आले.ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.सन 2025 मध्ये आरोग्य विभागामार्फत 79,985 इतक्या सामान्य रुग्णांची तपासणी करण्यात आली.यामध्ये केवळ 305 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सद्यस्थितीत यातील 302 रुग्ण ए आर टी औषधोपचारावर आले आहेत.जिल्ह्यातील लोकसंख्येचा आणि सीमावर्ती भागाचा विचार करता हे प्रमाण केवळ 0.4 इतके अल्प झाले आहे. तथापि हे प्रमाण शून्य आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कार्यरत आहे.त्यांच्या या एच आय व्ही मोहिमेला गरज आहे ती जागरुकतेची . . . सकारात्मकतेची . . आणि सामाजिक विषमता दूर करण्याच्या मानवतावादी विचारांची . . !
1 ) एचआयव्ही जनजागृतीसाठी 1 डिसेंबर रोजी सायकल व प्रभात फेरीचे आयोजन. त्याचबरोबर पंधरवड्यामध्ये फ्लॅश मॉब,व्याख्यान, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्ये,एचआयव्ही बाधित मुलांसाठी विविध स्पर्धा, वधु वर परिचय मेळावा, ट्रक ड्रायव्हर्स,हॉटेल/घरेलू / स्थलांतरीत कामगार व जोखीम गटातील व्यक्ती , तृतीयपंथी व सेक्स वर्कर महिला यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर
2) एड्स नियंत्रणासाठी प्रत्येकाने विशेषतः तरुण मुलांनी ABC फार्म्युला लक्षात ठेवा. तो फार्म्युला पुढील प्रमाणे A :- A for Abstinence
योग्य वेळ येईपर्यंत लैंगिक संबंध टाळणे.
B : - B for Be Faithful
एकमेकांच्या प्रति विश्वासू नाते असावे .
C :- C for condom
कंडोमसह सुरक्षित संबंध
या सर्वांची अमंलबजावणी करून एचआयव्ही संसर्गापासून आपणाला बचाव करता येतो - जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर
✍️ फारूक बागवान,
(माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर)