डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ३ विद्यार्थ्यांना २७ लाखांचे पॅकेज
schedule26 Jul 25 person by visibility 291 categoryशैक्षणिक

▪️दोघांना २१ लाख तर एकाला १८ लाख पॅकेज
कोल्हापूर : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील संगणक विभागाच्या ५ विद्यार्थ्यांची जस्पे (Juspay) कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांपेकी तिघाना २७ लाख रुपयांचे तर दोघांना २१ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे. तर ए.आय. एम. एल.च्या विद्यार्थ्याला १८ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
जस्पे ही एक भारतीय फिनटेक (FinTech) कंपनी आहे जी प्रामुख्याने ऑनलाइन पेमेंट सोल्यूशन्स पुरवते. ही कंपनी 2012 मध्ये स्थापन झाली असून मुख्यालय बेंगळूर येथे आहे. याशिवाय मुंबई, कोलकाता व परदेशातही कार्यालये आहेत.
या कंपनीच्या वतीने महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विविध चाळण्यामधुन पाच विद्यार्थ्यांची कंपनीकडून निवड करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अमेय वाले, ओम गायकवाड, रोहन एकशिंगे यांना प्रत्येकी २७ लाखांचे तर साक्षी पिसे व सिद्धेश पाटील यांना प्रत्येकी २१ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
दरम्यान, महाविद्यालयाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागाचा विद्यार्थी अनिकेत माने याची सिस्को कंपनीमध्ये निवड झाली असून त्याला १८ लाखाचे पॅकेज मिळाले आहे.
डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तम नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयाकडून कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देताना त्यांना कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल ट्रेनिंग, ग्रुप डिस्कशन, सॉफ्ट स्कील ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग दिली जातात. त्याचा चांगला फायदा प्लेसमेंटसाठी झाला.
या निवडीमध्ये अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे , संगणक विभाग प्रमुख प्रा. राधिका ढणाल, ए.आय. एम. एल विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.