कारगिल विजय दिवस उत्साह आणि अभिमानाने साजरा
schedule26 Jul 25 person by visibility 210 categoryसामाजिक

▪️शहीद जवानांच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना वंदन
कोल्हापूर : भारतीय लष्कराच्या शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक असलेला 26 वा कारगिल विजय दिवस आज उत्साहात व अभिमानाने जिल्हा सैनिक कार्यालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात हा 26 वा कारगिल विजय दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारकावर आदरांजली अर्पण करून आणि शहिदांना श्रद्धांजली वाहून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहिदांच्या वारसांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, कोल्हापूर ओ.आय.सी.ईसीएचएस ले. कर्नल विलास सुळकुडे (निवृत्त), जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन विलास चवदार तसेच कारगिल युद्धातील शहिदांचे वारस, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, जिल्हा सैनिक कार्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय सेनेतील शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करत जिल्ह्यातील सैनिकांचा अभिमान असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनातर्फे सैनिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवले जातील. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी प्रास्ताविकात भारतीय सैनिकांनी 1999 मधील कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आणि विजय दिवसाची माहिती दिली. शहीद जवानांच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनामार्फत सैनिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवले जात असल्याचे सांगून त्यांनी सर्व सैनिकांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक प्रकाश गुरव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.