100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाची भारतीय गुणवत्ता परिषदे मार्फत तपासणी
schedule16 May 25 person by visibility 178 categoryराज्य

कोल्हापूर : 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, अभिलेख दस्तऐवजीकरण, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातून जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूरने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर पुढील राज्यस्तरीय तपासणीसाठी या कार्यालयाची निवड करण्यात आली.
कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत समितीचे प्रतिनिधी केतन कवडे यांच्या टीमने जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूरची पुढील आणि अंतिम तपासणी केली. हा कार्यक्रम सामान्यतः कार्यालयीन कार्यपद्धतीत जलद आणि परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी राबवला जातो. या कार्यक्रमाचा उद्देश कामकाजाचा कार्यक्षमतेने आढावा घेणे, प्रक्रिया सुलभ करणे, नागरिक/ग्राहक केंद्रित सेवा सुधारणा करणे आणि पारदर्शकता वाढवणे असा आहे.
तपासणीदरम्यान कार्यालयातील स्वच्छतेसह विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पत्रकारांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा, शासकीय योजनांबाबत करण्यात येणारी प्रसिद्धी, सामाजिक माध्यमांचा वापर, कार्यालयातील स्वच्छता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतची कामे संस्थेकडून तपासण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.