नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव
schedule16 May 25 person by visibility 232 categoryराज्य

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक लाख क्षमतेचे भव्य क्रिकेट मैदान उभारावे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शासन स्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल. आजच्या सोहळ्यामध्ये क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानावरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याचा अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित वानखेडे मैदान येथील स्टॅन्डच्या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
लॉर्डस नाही तर वानखेडे क्रिकेटची पंढरी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या ठिकाणी देव असतो तीच खरी पंढरी. वानखेडे मैदानावर क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आहे. वानखेडे मैदान क्रिकेटसाठी आयकॉनिक आहे. या वानखेडे मैदानावर अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. रोहित शर्मा हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याने भारतासाठी जिंकून इतिहास रचला आहे. एखादा खेळाडू खेळत असतानाच त्याचे नाव मैदनातील स्टॅन्डला देण्याचा हा ‘वानखेडे’च्या इतिहासतील पहिलाच क्षण असल्याचेही मुख्यमंत्री फणडवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे क्रिकेटमधील योगदान मोठे आहे. देशातील क्रिकेटची उंची वाढवण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय क्रिकेटचा विकास करणाऱ्या प्रशासकांमध्ये शरद पवार हे अग्रेसर असल्यामुळे त्याचे नाव वानखेडे मैदानावरील स्टॅन्डला देणे यथोचितच आहे. अजित वाडेकर यांनी परदेशात जिंकण्याची सवय भारतीय क्रिकेटला लावली. १९७१ मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सोबत मालिका जिंकून त्यांनी इतिहास रचला. आज त्यांच्या नावाच्या स्टॅन्डचे अनावरण होत आहे ही देखील अभिमानाची गोष्ट आहे. अमोल काळे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये असताना कमी कालावधीमध्ये फार मोठे काम केले. क्रिकेटसाठी उत्तम ते सर्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी क्रिकेटसाठी पाहिलेले स्वप्न मुंबई क्रिकेट असोसिएशन नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
▪️रोहित शर्माने लगावलेला फटका रोहित शर्माच्या नावाच्या स्टॅन्डमध्ये गेल्याचे पाहणे हे भाग्याचे असेल. त्याने लवकरच असा क्षण आमच्यासाठी आणावा आणि आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करावी : मुख्यमंत्री फडणवीस
▪️हा आयुष्यातील विशेष क्षण : रोहित शर्मा
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, खेळत असतानाच वानखेडे मैदानावरील एका स्टॅन्डला नाव लागणे हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. देशासाठी खेळताना मिळालेला हा सन्मान आहे. आजचा दिवस विशेष आहे. वानखेडे मैदानात नाव असणे तेही अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबत हा मोठा सन्मान आहे.
‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष व खासदार शरद पवार म्हणाले की, वानखेडे उभारणीमध्ये तत्कालिन क्रीडा मंत्री म्हणून योगदान दिले. वानखेडे मैदानास मोठा इतिहास आहे. अनेक खेळाडू या मैदनावर घडले आहेत. क्रिकेटमधील महान खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान मुंबई असोसिएशनने नेहमीच केला आहे. रोहित शर्माचे नाव आज देशाच्या घराघरात पोहचले आहे. त्याच्या कर्तृत्वाची कायम आठवण रहावी यासाठी त्याचे नाव देण्याच्या निर्णया बद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन.
यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप यांच्यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, तसेच दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध क्लब्सचे सचिव व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.