निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहावे
schedule16 May 25 person by visibility 248 categoryराज्य

मुंबई : राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे / मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करणेच्या अनुषंगाने कळविले जात नाही. तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता पत्रव्यवहार केला जातो.
याची सर्व निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घेण्याचे आवाहन संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी फोन पे / गूगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याच्या अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये, तसेच व्हॉट्स अॅपद्वारे अथवा इतर सोशल मीडियावरून निवृत्तीवेतन बंद होऊ नये, याकरीता लिंक ओपन करून फॉर्म भरणेबाबत कळविले जात नाही. अशा प्रकारे दूरध्वनीद्वारे / मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास संबंधित कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.