कोल्हापूर : विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमात सन 2021-22 या़ वर्षामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. दि.12 व 13 मे 2022 रोजीच्या यशदा पुणे येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण तथा आढावा बैठकीमध्ये महानगरपालिकेला प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यशदा पुणे येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेतर्फे शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडीक यांनी हा गौरव स्विकारला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा हॉस्पीटल व 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र यांच्या मार्फत विविध राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाची अंम्मल बजावणी करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने गरोदर माता नोंदणी त्यांची तपासणी, 0 ते 16 वयोगटातील मुलांचे नियमित लसीकरण, कुटुंब नियेाजन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना इत्यादी कार्यक्रम राबविले जातात. हे कार्यक्रम महानगरपालिकेच्या वैद्यकिय टिमने प्रभावीपणे राबवून हे बक्षिस मिळविलेले आहे.
या विशेष कामगिरीकरता प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे उद्दीष्ट पुर्तीकरता हॉस्पीटल व कुटुंब कल्याण केंद्राकडील सर्व वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, लॅब टेक्नीशीयन, फार्मासीस्ट व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले आहे.