कोल्हापुरात १७ मे रोजी निघणार तिरंगा पदयात्रा
schedule15 May 25 person by visibility 276 categoryराज्य

कोल्हापूर : पहेलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी आठ वाजता कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
दसरा चौक येथून सुरू होणारी ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा- बिंदू चौक- शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित होईल.
या पदयात्रेच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक,भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी ही पदयात्रा समस्त कोल्हापूरकरांची आहे असे नमूद केले. प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाने कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
या पदयात्रेमध्ये हजारो कोल्हापूरकर स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दसरा चौकात या पदयात्रेचा शुभारंभ माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या हस्ते होणार असून तिरंगा हाती घेतलेले नागरिक, भारत माता, सैनिक आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, फलक यांचा समावेश या पदयात्रेत असेल ती माहिती खासदार महाडिक यांनी दिली.