कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू, भाविकांना आवाहन
schedule13 May 25 person by visibility 315 categoryसामाजिक

*जोतिबा मंदिरातही होणार अंमलबजावणी
कोल्हापूर : येथील अंबाबाई, जोतिबा मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान कोल्हापूरकडे तसेच श्री. केदारलिंग (जोतिबा) देवस्थान वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथे काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करुन मंदिरामध्ये प्रवेश करतात, काही मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांसाठी ड्रेसकोड करणेत आलेला आहे. श्री. करवीर निवासिनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठा पैकी एक शक्तीपीठ असून, या मंदिराचे महत्व फार आहे,
तरी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता, पारंपारीक पध्दतीने कपडे परिधान करावे, मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करुन व त्याचे पालन करुन पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावे, असे देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने नम्र आवाहन करणेत येत आहे. सदर सुचनाचे पालन करुन देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.