युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी : मंत्री चंद्रकांत पाटील
schedule13 May 25 person by visibility 251 categoryराज्य

मुंबई : युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनसीसी) पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक झाली. यावेळी राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर नोंदणी सुरू आहे. नोंदणी करताना विद्यार्थी आठवड्यातून किती दिवस आणि किती तास सेवा देऊ इच्छितात हे देखील नमूद करू शकतात. ही नोंदणी जिल्हा स्तरावर केली जाणार असून, संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही देण्यात येणार आहे. आपत्तीकालीन किंवा युद्धजन्य परिस्थितीत या सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्सची मदत घेता येणार आहे. देशासाठी उभे रहा सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.