महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; कोकण विभागाची बाजी
schedule13 May 25 person by visibility 265 categoryशैक्षणिक

पुणे : महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा निकाल हा तब्बल ९४.१० टक्के इतका लागल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे.
याशिवाय यंदा एकूण २८ हजार ५१२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेला राज्यातल्या ९ विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
▪️विभागनिहाय SSC निकाल...
कोकण विभाग - ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग - ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर - ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर - ९०.७८ टक्के