"कोल्हापूर हायकर्स" ची "दीपोत्सव" सायंकाळ उत्साहात
schedule18 Oct 25 person by visibility 129 categoryसामाजिक

पन्हाळा : कोल्हापूर हायकर्स फाउंडेशन प्रा. लि ने वसुबारसच्या पावन संध्याकाळी पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशात ‘एक सांज पन्हाळगडावर’ उपक्रम अत्यंत उत्साहात व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला.या दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे पूजन करून व पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला. शिवमंदिर व महाराणी ताराराणी साहेबांचा राजवाडा परिसरात हजारो दिव्यांच्या साक्षीने ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दानी आखाडा, कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवारींचा झंकार, ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्त मंत्रमुग्ध झाले.यानंतर सज्जा कोटी परिसरात सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन हजारो दिव्यांनी गड प्रकाशमय केला. त्या तेजोमय प्रकाशात इतिहास अभ्यासक व संशोधक इंद्रजित सावंत यांनी “महाराणी ताराबाई साहेबांचा दिल्लीपती औरंगजेबाशी लढा” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. अत्युच्च उत्साहात आणि शिवमय वातावरणात “दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी” लावून हा दीपोत्सव संपन्न झाला.
हा उपक्रम यंदा १३व्या वर्षी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्या वतीने यशस्वीरित्या पार पडला.
या वर्षीच्या दीपोत्सवात विशेष सहकार्य लाभले ते यशोदा वेल्फेअर फाउंडेशनचे सर्व सदस्य, तसेच डॉ. विनिता पाटील (यशवंत एकनाथ पाटील यांच्या नातसून), अविनाश भाले, दिगंबर जाधव, आणि शिवम सरनाईक यांचे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर हायकर्सचे सदस्य विजय ससे, श्रावणी पाटील, आरती संकपाळ, रणसिंग जाधव, श्रेया शिंदे, ओम कोगनुळे, सागर पाटील, शुभम गांधाडे, सार्थक संकपाळ, विक्रम देशमुख, सचिन भाट, श्रेयश ढवळे, इंद्रजीत मोरे, अतुल सुतार, सत्यजित माने, रोहित पवार, अक्षद गायकवाड, अमरसिंग शिंदे, निमेश जाधव, समृद्धी पाटील, संजय कुलकर्णी, आणि स्नेहा जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले.कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, डॉ. विनिता पाटील, पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष नितीन भगवान, पन्हाळा तालुका बी न्यूज चे प्रमुख प्रतिनिधी राजकुमार जाधव माजी नगराध्यक्षा रूपाली ढडेल, वीरभद्र मर्दानी आखाड्याचे प्रमुख अभिषेक पाटील, कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील, तसेच कोल्हापूर हायकर्स परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.कोल्हापूर हायकर्स ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अपरिचित गड-किल्ल्यांचे संवर्धन, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि साहसी उपक्रमांद्वारे युवकांमध्ये निसर्गप्रेम आणि इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करत आहे.संस्थेचा उद्देश केवळ भटकंती नव्हे, तर इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधणे हा आहे.


