कोल्हापूर शहरातील विकास कामे मंजूरीकरीता एक दिवसीय कॅम्पमध्ये 55 कामे अंतिम मंजूरीस सादर
schedule13 Nov 25 person by visibility 56 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून विविध विकास कामे करणेसाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे मंजुरीने प्रशासकीय मान्यता होणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध प्रस्ताव सादर केले जातात. सध्या महानगरपालिकेच्या विविध विकास कामाकरिता राज्य शासनाच्या विविध योजनातून तसेच जिल्हास्तरीय योजनांमधून निधी उपलब्ध झाला आहे. या योजनांमधील विविध कामांना मंजूरी मिळणेच्या अनुषंगाने आज गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृह (स्थायी समिती हॉल) येथे एक दिवसीय विशेष कॅम्पचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पमध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत मूलभूत सेवा सुविधा अंतर्गत मंजूर अनुदानातील 30 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. यातील 5 कोटी अनुदानातील 27 कामे नागरी वस्ती सुधारणासाठी प्रस्तावित आहेत. सदरची कामे अदाबाकी करुन मुख्य लेखापरिक्षकांमार्फत उपसमितीकडे पुढील प्रशासकीय मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केटकडील 7 प्रस्तावित कामे मुख्य लेखापरिक्षकांमार्फत अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आलेली आहेत. विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी कडील 9 अंदाजपत्रके व विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट कडील 6 अंदाजपत्रके मंजूरीसाठी पुढे सादर करण्यात आलेली आहेत. याचबरोबर मूलभूत सोयी सुविधामधील प्राप्त अनुदानापैकी 6 कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे व 10 कामे सर्व बाबींची पुर्तता करुन ठेकेदारांना वर्कऑर्डर घेणेबाबत नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. सदरचा कॅम्प शुक्रवारीही सुर राहणार आहे.
यावेळी मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, सहा.विद्युत अभियंता अमित दळवी व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.